मुंबई महानगरपालिकेत 227 प्रभागांमध्ये, तर नवी मुंबई महानगरपालिकेत 111 प्रभागांमध्ये मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठीचा सविस्तर कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून उमेदवारांसाठी तसेच पक्षांसाठी महत्त्वाच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.
महापालिका निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे :
-
नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची मुदत: 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025
-
अर्जांची छाननी: 31 डिसेंबर 2025
-
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 2 जानेवारी 2026
-
निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी: 3 जानेवारी 2026
-
मतदान: 15 जानेवारी 2026
-
मतमोजणी: 16 जानेवारी 2026
मुंबई महापालिकेची निवडणूक यावेळी केवळ प्रशासनापुरती मर्यादित न राहता राजकीय प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे. विशेषतः ठाकरे कुटुंबासाठी ही निवडणूक अत्यंत निर्णायक मानली जात आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि राज ठाकरे यांच्या मनसे एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीचा सामना थेट भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी होणार आहे.
याआधी 2017 मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा इतिहासही चर्चेत आहे. त्या वेळी राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असतानाही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरले होते. त्या निवडणुकीत अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. शिवसेनेने 84 जागा तर भाजपने 82 जागा जिंकल्या होत्या. या काट्याच्या लढतीनंतर पुन्हा एकदा शिवसेनेचाच महापौर मुंबई महापालिकेवर विराजमान झाला होता.
दरम्यान, नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूकही तितकीच लक्षवेधी ठरणार आहे. अलीकडेच नवी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री गणेश नाईक यांच्यात झालेल्या शाब्दिक वादामुळे राजकीय वातावरण तापले होते. या घटनेनंतर भाजप आणि शिवसेना शिंदे गटात काहीसा तणाव निर्माण झाल्याचीही चर्चा रंगली होती. त्यामुळे नवी मुंबईत महायुतीमधील अंतर्गत समीकरणे कशी जुळतात, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकूणच पाहता, 29 महापालिकांच्या निवडणुकांच्या घोषणेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या महत्त्वाच्या महानगरपालिकांमधील निकाल राज्यातील आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम करणारे ठरणार आहेत. आता पुढील काही आठवडे प्रचार, रणनीती, युती-आघाड्यांच्या हालचाली आणि आरोप-प्रत्यारोपांनी भरलेले असणार आहेत.