Source: News 18 Marathi
मुंबई : आज मुंबईतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर शिवसेना (ठाकरे गट) तर्फे जोरदार आंदोलन पार पडले. सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त कृती आणि वक्तव्यांच्या निषेधार्थ हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत नेत्यांवर टोकाची टीका केली. अधिवेशनाच्या काळात ‘रमी’ गेम खेळणारे माणिकराव कोकाटे, काळी जादू केल्याचा आरोप असणारे भरत गोगावले, तसेच हॉटेलच्या खोलीत पैशांची बॅग घेऊन थांबल्याचा आरोप असलेले संजय शिरसाट अशा विविध नेत्यांना लक्ष्य करत आंदोलनस्थळी घोषणांचा पाऊस पाडण्यात आला.
या आंदोलनानंतर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी महायुतीतील भ्रष्ट नेते आणि मंत्र्यांवर कठोर शब्दांत हल्लाबोल केला. फडणवीसांचा उल्लेख करताना त्यांनी त्यांची अवस्था “सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही” अशी झाली असल्याचं सांगितलं. इतकंच नव्हे तर, “मला त्यांची कीव येते,” असंही ते म्हणाले.
आंदोलनस्थळी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करत उद्धव ठाकरे म्हणाले, “२०१४ मध्ये नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीने ‘चाय पे चर्चा’ मोहीम राबवली होती, त्याच धर्तीवर आता महाराष्ट्रात ‘भ्रष्टाचार पे चर्चा’ सुरू करायची आहे. कुठेही जा, जिथे बसा — चहाच्या टपरीवर, सलूनमध्ये केस कापायला, किंवा कुठल्याही ठिकाणी. मात्र, सावली बार वगळून! तिथे बसूनही भ्रष्टाचाराविरोधी चर्चा सुरू करायची. जोपर्यंत हे भ्रष्ट मंत्री सत्तेतून काढले जात नाहीत, तोपर्यंत आपलं आंदोलन थांबणार नाही.”
ते पुढे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाशवी बहुमत असूनही, आणि वरती दिल्लीत त्यांचे बापजादे (नेते) बसूनही, त्यांना भ्रष्ट मंत्र्यांना हटवण्याची हिंमत होत नाही. काही वेळासाठी आपण गृहित धरू की, फडणवीसांनी स्वतः कोणताही भ्रष्टाचार केला नाही. पण मग एवढी बदनामी ते का ओढवून घेत आहेत? इतरांच्या चुकांवर पांघरून का टाकत आहेत?
तुमच्याकडे (फडणवीस) बहुमत आहे, तुमच्याकडे जगातील सर्वात मोठा पक्ष आहे — भाजपा. पण त्या भाजपकडे आज भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाकून इतरांना नेमण्यासाठी माणसं नाहीत का? जसं भाजपमध्ये अध्यक्ष करण्यासाठी माणूस नाही, तसं मंत्री बदलण्यासाठीही कोणी नाही का? की मग तुमच्यावर कुणाचा दबाव आहे? हा भ्रष्टाचार तुम्हाला पटतोय का?
फडणवीसांनी हे स्पष्ट करावं — भ्रष्ट मंत्र्यांना काढायचं आहे पण कुणीतरी अडथळा आणतोय, की त्यांनाच हे सगळं मंजूर आहे. जर त्यांना स्वतःला हे मान्य नसेल, तर त्यांनी स्पष्ट सांगावं की, ‘मला भ्रष्ट लोकांना सत्तेतून हटवायचं आहे, पण माझी अवस्था अशी आहे की ना सहन होतंय, ना सांगतं येतंय.’”
या संपूर्ण भाषणातून उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि महायुती सरकारवर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून थेट वार केला. शिवसैनिकांनी आता प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करून जनजागृती करावी, अशी आवाहनात्मक भूमिका त्यांनी घेतली. त्याचबरोबर फडणवीसांची ‘अवस्था’ हा त्यांचा मुख्य राजकीय टोला ठरला.