ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षामधील जागावाटपाचे गणितही अंतिम झाले आहे. या आघाडीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला एकूण 11 जागा देण्यात आल्या आहेत. या जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. पक्षाने या सर्व जागांसाठी उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत :
१) वॉर्ड क्रमांक 43 – श्री. अजित रावराणे,
२) वॉर्ड क्रमांक 140 – श्री. संजय भीमराव कांबळे,
३) वॉर्ड क्रमांक 78 – श्रीमती रदबा जावेद देऊळकर,
४) वॉर्ड क्रमांक 48 – अॅड. गणेश शिंदे,
५) वॉर्ड क्रमांक 170 – श्रीमती रूही मदन खानोलकर,
६) वॉर्ड क्रमांक 51 – श्रीमती आरती सचिन चव्हाण,
७) वॉर्ड क्रमांक 112 – श्रीमती मंजू रविंद्र जायस्वाल,
८) वॉर्ड क्रमांक 224 – श्रीमती सानिया कासिफ शाह,
९) वॉर्ड क्रमांक 165 – श्री. अभिजीत दिलीप कांबळे,
१०) वॉर्ड क्रमांक 107 – श्री. भरत हंसराज दनानी,
११) वॉर्ड क्रमांक 211 – श्री. सुफियान अन्सारी
यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यावर जागावाटपावरून मोठा संघर्ष होईल, असे अनेक राजकीय विश्लेषकांचे मत होते. मात्र दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सलग बैठका घेत, चर्चा करून आणि सर्व बाबींचा विचार करत जागावाटपाचे अवघड गणित सोडवले. त्यातच आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षालाही सामावून घेत आघाडीचे स्वरूप अधिक व्यापक करण्यात आले आहे.
या आघाडीनुसार शिवसेना ठाकरे गट सर्वाधिक 163 जागांवर निवडणूक लढवणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 53 जागा देण्यात आल्या असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 11 जागांवर आपले उमेदवार उभे करत आहे. या स्पष्ट सूत्रामुळे आघाडीतील संभ्रम दूर झाला असून आता सर्व पक्ष प्रचाराच्या तयारीला लागले आहेत.
एकूणच मुंबई महापालिका निवडणूक यंदा अत्यंत रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत. सत्ताधारी शिवसेना-भाजप आघाडी आणि ठाकरे बंधू-मनसे-राष्ट्रवादी शरद पवार आघाडी यांच्यात थेट सामना होणार आहे. या निवडणुकीचा निकाल केवळ मुंबई महापालिकेपुरता मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या राजकारणावरही परिणाम करणारा ठरू शकतो, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.