Source: News 18 Marathi
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची चिन्हे दिसत आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे बंधू एकत्र येण्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात वेगाने पसरत आहे. अनेक वर्षांपासून वेगळ्या मार्गाने राजकारण करणारे ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का, या प्रश्नावर विविध तर्कवितर्क रंगू लागले आहेत. त्यांच्या या संभाव्य युतीमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असल्याने सर्वच पातळीवर लक्ष लागले आहे.
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UBT) आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते देखील या चर्चेमुळे उत्साही झाले आहेत. दोन्ही गटांमध्ये सकारात्मक वातावरण दिसत असून कार्यकर्त्यांमध्ये नव्या उमेदीचा संचार झाल्याचे बोलले जात आहे. केवळ मुंबई महापालिका निवडणूकच नव्हे, तर ठाणे, पुणे, नाशिक आणि इतर महापालिकांमध्येही ठाकरे गट आणि मनसेची युती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही आठवड्यांत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. या भेटींमुळे दोन्ही पक्षांतल्या चर्चांना अधिक बळ मिळाल्याचे राजकीय वर्तुळातील जाणकार सांगतात. मराठी मतांची फूट थांबवून ती एका गोटात एकवटण्याचा प्रयत्न या युतीतून होऊ शकतो. विशेषतः मुंबई, ठाणे आणि इतर शहरी भागात ही समीकरणे निवडणुकीच्या निकालावर थेट परिणाम करू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.
जागा वाटपाबाबत मोठी चर्चा
काही वृत्तांनुसार, ठाकरे गट आणि मनसेच्या नेत्यांमध्ये जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचे समोर आले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत 50-50 टक्के जागांचे वाटप ठरल्याची चर्चा आहे. म्हणजेच, मुंबईतील निम्म्या जागांवर शिवसेना (UBT) उमेदवार उतरणार तर उरलेल्या निम्म्या जागांवर मनसेचे उमेदवार मैदानात उतरणार. त्याचबरोबर इतर महापालिकांमध्ये मात्र 60-40 टक्के जागा वाटपाचा फॉर्म्युला लागू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात 60 टक्के जागा ठाकरे गटाकडे आणि 40 टक्के जागा मनसेकडे जातील, अशी चर्चा रंगत आहे.
मनसे नेत्याची महत्त्वाची प्रतिक्रिया
या चर्चांदरम्यान मनसेचे वरिष्ठ नेते अविनाश अभ्यंकर यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. जागा वाटपाच्या चर्चेबद्दल विचारले असता त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, "आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत आणि पक्षाच्या आदेशावर काम करतो. आम्हाला जागा वाटपाबाबत काही अधिकृत माहिती मिळालेली नाही. माध्यमांमधून किंवा सूत्रांमधून जी माहिती समोर येते, त्यावर आम्ही भाष्य करू शकत नाही. खरी माहिती पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडेच आहे."
ते पुढे म्हणाले की, "मनसेकडून सर्व निवडणूक पूर्व तयारी सुरू आहे. बैठका घेतल्या जात आहेत. राज ठाकरे काय सांगतात, हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. मागील अनेक वर्षे आमचे कार्यकर्ते थेट रस्त्यावर उतरून काम करत आहेत. त्यामुळे आम्हाला लोकांच्या भावना आणि त्यांच्या अडचणींचा थेट अंदाज आहे. त्याच बळावर आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत."
राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
या वक्तव्यामुळे जागा वाटपाविषयी अजूनही अधिकृत भूमिका स्पष्ट झालेली नसली तरी राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. ठाकरे बंधूंची युती झाल्यास शिवसेना (UBT) आणि मनसेचे संयुक्त बळ भाजप आणि शिंदे गटासाठी मोठं आव्हान ठरू शकतं, असेही अनेक तज्ज्ञांचे मत आहे. मराठी मतदारांचा कल या युतीकडे वळल्यास मुंबईसह इतर महापालिकांमध्ये या आघाडीचा फायदा होण्याची दाट शक्यता आहे.
सध्या मात्र अधिकृत घोषणा व्हायची आहे. मात्र, ठाकरे बंधूंच्या वाढत्या भेटीगाठी, कार्यकर्त्यांमधील सकारात्मक वातावरण आणि येणाऱ्या निवडणुकीची पार्श्वभूमी लक्षात घेता या चर्चेला मोठं महत्त्व आलं आहे. पुढील काही दिवसांत या संदर्भात महत्त्वाचे निर्णय जाहीर होऊ शकतात, अशी राजकीय वर्तुळातील चर्चा आहे.