चव्हाण यांचा उदय होण्याआधी या मतदारसंघात भाजपाकडून जयसिंगराव गायकवाड आणि श्रीकांत जोशी यांनी प्रतिनिधित्व केले होते. मात्र जोशी यांच्या एका यशानंतर भाजपाला ही जागा पुन्हा जिंकता आली नाही. यावेळी भाजपाने वेळ न दवडता पूर्वतयारी सुरू केली आहे. १ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या मतदार नोंदणी प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर भाजपाने संघटनात्मक हालचालींना गती दिली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या विभागीय बैठकीला खासदार अजित गोपछडे, विभागीय संघटनमंत्री संजय कौडगे, जिल्हाध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे व किशोर देशमुख, महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, तसेच अनेक आघाडी प्रमुख आणि कार्यकर्ते उपस्थित होते. परभणी जिल्ह्यातून राज्यमंत्री मेघना बोर्डीकरही या बैठकीत सहभागी झाल्या. बैठकीत पुढील निवडणुकीसाठी नियोजन, मतदार नोंदणीची आखणी आणि संघटनात्मक मुद्द्यांवर चर्चा झाली.
गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा आणि आमदार सतीश चव्हाण यांच्यात मतभेद निर्माण झाले. याशिवाय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते, ज्यांचा शैक्षणिक संस्थांशी थेट संबंध आहे, मागील दोन वर्षांत भाजपात दाखल झाले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात भाजपासाठी पोषक वातावरण तयार होत असल्याचे मानले जाते. भाजपाचा मुख्य भर सध्या जास्तीत जास्त मतदार नोंदविण्यावर आहे.
चव्हाण यांचा आतापर्यंतचा विजय हा नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली यांसारख्या जिल्ह्यांतील काँग्रेस नेते व संबंधित संस्थांशी जोडलेल्या प्राध्यापक-कार्यकर्त्यांच्या मदतीने शक्य झाला होता. मात्र आता या नेत्यांपैकी बरेच जण भाजपाच्या छावणीत गेले आहेत. यामुळे चव्हाण यांचे आधीचे समीकरण कोलमडण्याची चिन्हे आहेत. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर थोरल्या पवारांचा पाठपुरावा करणाऱ्या नेत्यांना चव्हाण यांच्याविषयी पूर्वीसारखी निष्ठा राहिलेली नाही.
युतीच्या समीकरणानुसार ही जागा अजित पवार गटाला मिळेल का, याबाबत अजूनही संभ्रम आहे. मात्र भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने स्पष्ट केल्याप्रमाणे, ही जागा युती धर्म म्हणून सोडली जाण्याची शक्यता कमी आहे. भाजप स्वतंत्रपणे या मतदारसंघात उमेदवार देण्याच्या विचारात आहे. तरी उमेदवारी कोणाला द्यायची, हा मुद्दा सध्या चर्चेत नाही.
शनिवारी मराठवाड्याच्या अनेक भागात पाऊस आणि पूरस्थिती असतानाही भाजपाने नियोजित बैठक रद्द न करता सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना छत्रपती संभाजीनगरात एकत्र आणले. यावरून पक्षाची निवडणुकीबाबतची गांभीर्यता दिसून आली.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना सांत्वनपर भेटीदरम्यान सतीश चव्हाण यांनाही या विषयावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी स्वतः चव्हाण यांनी मान्य केले की भाजप आपला उमेदवार स्वतंत्रपणे उभा करण्याच्या तयारीत आहे. त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांचाही तोच अंदाज आहे. त्यामुळे मराठवाडा पदवीधर मतदारसंघात आगामी निवडणुकीत रंगतदार लढत होण्याची दाट शक्यता आहे.